Sonali Kulkarni Instagram – ‘सो कुल टेक 2’, या सोनाली कुलकर्णींच्या क्रिस्प आणि खुमासदार पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. किशोर कुमारच्या बंगल्यात बनवलेल्या उपाहार गृहात हा छोटेखानी पण देखणा कार्यक्रम आयोजित केला होता. सोनाली बेंद्रे या प्रथितयश अभिनेत्री च्या हस्ते हे पुस्तक वाचकांना सोपवण्यात आले. ज्ञानेश्वरी या रेडिओ आरजे ने माईक हातात घेतला आणि इथून पुढे प्रफुल्लित मराठी शब्दांची मांदियाळी आणि विवेकशील विचारांची संपन्न मैफिल अनुभवायला मिळाली. दोन्ही सोनाली या गुणी आणि अतिशय ग्रेसफुल कलाकार आहेत. पण तेवढ्याच दोघीही बुद्धिमान, सर्जनशील आणि व्यासंगी विदुषीही ! सोनालीने नेमक्या आणि नेटक्या भाषेत आपल्या पुस्तकाचा परिचय करून दिला. लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणीच्या अतिथी संपादक या नात्याने त्यांनी लिहिलेल्या सदरांचे उत्कृष्ट संकलन या पुस्तकात आहे. भाषा ओघवती आणि प्रवाहशील. त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातले प्रसंग, व्यक्ती आणि आठवणींची गुंफण या पुस्तकाच्या अंतरंगातून उलगडत जाते. वाचतेवेळी प्रसंगातील बारकावे आणि त्यांतील उपमा आपल्यासमोर जिवंत चित्र उभे करतात. सोनालीने ‘फ्रोझन फोटो ‘ या लेखाचे वाचन केले. त्यात आयोजकाच्या पत्नीची तारांबळ, तिच्या आग्रहाने सोनाली ने त्यांना केलेली मदतीची ऑफर आणि मग फ्रीझमधल्या फळे भाज्यांनी त्यांची उडवलेली भंभेरी याचे दोन पानांत केलेले वर्णन, अवर्णनीयच ! सोनालीमध्ये मधेच सुधा मूर्ती भेटतात. आम्ही गुन्हा घडला की घटनास्थळाचा पंचनामा करतो. त्यात रटाळ आणि रुक्षपणा तर असतोच पण बारकावे नसल्याने कोर्टात केस मांडताना अनेकदा अपयश येते. पण जर सोनालीने जर एखादा असा पंचनामा लिहिला तर गुन्हेगाराला शिक्षा पक्की ! या वीकेंड ला या पुस्तकाची धमाल मेजवानी अनुभवतोय! सोनाली तुम्ही माणसे वाचता, प्रसंग आणि अनुभवांना मूर्तरूप देता आणि सो कुल सारखी सुंदर कलाकृती आम्हा वाचकांना मिळते. अशा या सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आणि संवेदनशील लेखिकेला मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐 | Posted on 15/Feb/2025 16:56:04
Check out the latest gallery of Sonali Kulkarni



