Parna Pethe Instagram – “विषय हार्ड” : पुण्या-मुंबईच्या बाहेरचा तरी सैराटमय नसलेला एक नविन मराठी चित्रपट
गेल्या काही वर्षात गावाकडचा चित्रपट बनवायचा म्हणजे त्यात गेला बाजार ३०-४०% तरी “ सैराट” च प्रतिबिंब दिसलंच पाहिजे असा एक अघोषित नियम होता. (त्यानी त्या चित्रपटांना किती उपयोग झाला हे “बल्लाळदेवच” जाणे) ह्या भितीपोटीच मी “विषय हार्ड” च पोस्टर बघून त्याचा ट्रेलर बघितला नव्हता.
त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचं तर पर्णचा चित्रपट आहे एवढ्याच कारणासाठी कोरी पाटी ठेऊनच “विषय हार्ड” बघायला गेलो आणि जाणवलं की पुण्या-मुंबई बरोबरच पुन्हा एकदा कोल्हापुरातून चांगले चित्रपट बनवायला सुरवात झालेली आहे.
ढोबळमानाने बघितलं तर एक नायक, एक नायिका आणि शेवटी त्यांचं यशस्वी झालेलं “चाकोरी बाहेरचं” प्रेम अशी जरी चित्रपटाची ठराविक चौकट असली तरी त्याची जी मांडणी ह्यांच्या चमूने केली आहे ती अफलातून आहे.
बरेच नवखे कलाकार असले तरी कुठेच कुणाचा नवखे पणा जाणवत नाही. एखाद-दुसऱ्या सिन मध्ये असणाऱ्या कलाकारांनी पण उत्तम काम केले आहे.
निर्मितीमूल्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुठेच तडजोड केलेली जाणवत नाही.
लेखक दिग्दर्शक नायक निर्माता असा एक खांबी तंबू असला तरी ह्या सर्व भूमिका सुमितनी वेगवेगळ्या ठेवल्या आहेत. आणि फक्त नायक- नायिकेला जास्त “स्क्रीन टाईम” न देता, भूमिकेनुसार प्रत्येक पात्राला योग्य तेवढा आणि योग्य तेथे वेळ दिलेला आहे. जवळपास प्रत्येक पात्र अचानक सिन मध्ये न आणता प्रत्येकाचं नीट इंट्रोडक्शन करुन दिलय.
एका पण सिन मध्ये असं वाटतं नाही की सगळे कलाकार कोल्हापूरकडचे आणि आपली नायिका डॉली पुण्याची. पुण्याच्या पर्णनी कोल्हापुरी भाषेचा लहेडजा एवढ्या उत्तमरित्या पकडला आहे की ज्यांना पर्ण (कदाचित) माहिती नसेल त्यांना समजणार पण नाही की ही कोल्हापूरची नसून पुण्याची पोरगी आहे ते.
चित्रपट ज्या काळात घडतो तो काळ म्हणजे…. ते मी नाही सांगत, तुम्ही स्वतः थेटरात जाऊनच बघा की. फक्त एवढंच सांगतो की तो काळ आणि त्या काळात आपण सगळ्यांनीच केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच बारकाईने दाखवल्यात.
असो, अजून जास्त काही लिहीत नाही. कृपया “विषय हार्ड” OTT वर येण्याची वाट बघू नका. जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच बघा. दोन-अडीच तास निखळ मनोरंजनाचा आनंद घ्या.
– परांजपे चष्मेवाले ( एक पुणेकर)
#विषयहार्ड #मराठीचित्रपट #parnapethe #marathimovie #vishayhard #परांजपेचष्मेवाले
ता.क. हे वरचं सगळं लिहून झाल्यावर मी “विषय हार्ड” चा ट्रेलर पाहिला. ट्रेलर मध्ये मला २०-२५% सैराट दिसला.😬 पण चित्रपटात सैराट नक्की नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर. | Posted on 09/Jul/2024 23:02:15



