Resham Tipnis Instagram – हजार प्रयोग होईपर्यंत मराठी रंगभूमीवरील अनेक दिग्गज नटांनी ‘वस्त्रहरण’ अनेक वेळा पाहिलं होतं. त्यात डॉ. काशिनाथ घाणेकरांचा पहिला नंबर होता. शिवाजी नाटय़मंदिर आणि रवींद्र नाट्यमंदिरला जेव्हा जेव्हा ‘वस्त्रहरण’ असायचं, तेव्हा तेव्हा ते स्वत: तिकीट काढून त्याला बसायचे. मनसोक्त हसायचे. ‘वस्त्रहरण’मुळे मी त्यांचा जवळचा मित्र झालो होतो. मनात विचार आला – डॉ. घाणेकरांनी जर पाहुणा कलाकार म्हणून ‘वस्त्रहरणा’त भूमिका केली तर इतरही कलावंत होकार देतील. आणि तसंच झालं. मालवणी कलावंतांना लंडनला जाता यावं म्हणून डॉ. घाणेकर त्वरित ‘हो’ म्हणाले आणि घाणेकर ‘वस्त्रहरणा’त पाहुणे कलाकार म्हणून भूमिका करताहेत म्हटल्यावर मास्टर भगवानदादा (धृतराष्ट्र), नाना पाटेकर (भीम), अशोक सराफ (धर्म), बाळ धुरी (दुर्योधन), मास्टर सचिन (विदुर), विजू खोटे (शकुनी मामा), ज्येष्ठ नाट्य – समीक्षक कमलाकर नाडकर्णी (देव), विजय चव्हाण (द्रौपदीकाकू), स्वत: घाणेकर (दु:शासन) असा नटसंच तयार झाला..
तो प्रयोग षण्मुखानंद नाट्यगृहात ठेवला होता… तिकीट खिडकीवर तोबा गर्दी झाली. प्रयोग काही तासांत ओव्हरपॅक झाला. त्या प्रयोगाला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं अर्धेअधिक मंत्रिमंडळ दादांच्या धाकामुळे असेल- तिकीट काढून बसलं होतं. मंगेशकर घराणंही हजर होतं. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की, आम्हा मालवणी कलावंतांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लतादीदी भाषण करण्यास तयार झाल्या. त्यांच्या मिश्कील स्वभावानुसार त्या म्हणाल्या, ‘‘आमचे मालवणी कलावंत लंडनला ‘वस्त्रहरण’ करण्यास निघाले आहेत. परंतु लंडनला गेल्यावर त्यांच्यावर ‘वस्त्रहरण’ करण्याची वेळच येणार नाही. कारण तिथले लोक मुळातच तोकडे कपडे घालतात.’’ दीदींच्या या कॉमेंटमुळे हॉल हास्यसागरात बुडून गेला…!
( सदर फोटोत सर्वात वर एकदम डाव्या बाजूला डॉक्टर काशिनाथ घाणेकर..!!!) | Posted on 17/Feb/2025 14:39:13


